राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळातील आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे.
त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली.
परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.
Leave a Reply