कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास

कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.
इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी १६९८ मध्ये सातार्‍याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.
करवीर गादीची स्थापना करणार्‍या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्याचे केंद्र करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसर्‍या पत्नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता. १७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली.
१७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, त्याचे अस्तित्त्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*