नागपूर जिल्ह्याचा इतिहास

गोंड राजा बुलंद शहा या देवगड (छत्तीसगड) च्या राजाने १७०२ साली नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसवले. १७०६ मध्ये बख्त बुलंद शहाच्या मुलाने-राजा चांद सुल्तान याने-देवगडवरून आपली राजधानी नागपूरमध्ये हलवली. राजा चांद सुल्तानाकडून रघुजी भोसले यांनी १७४९ मध्ये नागपूर शहर जिंकले व तेव्हापासून भोसलेंचे नागपुरावर राज्य सुरू झाले. १८१७ मध्ये सीताबर्डीचे प्रसिध्द युध्द लढले गेले. लढाईत मराठे हरले आणि नागपूर शहर व परिसर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. १८५३ मध्ये ब्रिटिशांनी नागपूरमध्ये वसाहत स्थापन केली. १८६१ मध्ये नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी बनली,तर १८६४ मध्ये नागपूर नगरपालिका अस्तित्वात आली. १८६७ मध्ये नागपूरचे भविष्य बदलवणारी घटना घडली आणि ती म्हणजे रेल्वेच्या साहाय्याने (जी.आय.पी.) नागपूर व मुंबई ही शहरे जोडली गेली.

२८ डिसेंबर,१८९१ रोजी कॉंग्रेसचे ७ वे अधिवेशन लालबाग परिसरात भरले होते. १९१२ मध्ये नागपूरमधील विधानसभेच्या इमारतीची पायाभरणी झाली. १९२० मध्ये कॉंग्रेसचे (३५ वे) अधिवेशन दुसर्‍यांदा नागपुरात झाले. या अधिवेशनात ६० हजार लोकांनी सहभाग घेतला. या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. जमनालाल बजाज होते. त्यांनी अधिवेशनात सर्वांसमक्ष प्रथमच महात्मा गांधींना जनतेचे नेते असे गौरविले. त्याच काळात ब्रिटिश सरकारच्या निषेधार्थ झेंडा सत्याग्रह आंदोलन नागपुरात झाले. या सत्याग्रहात पंडित नेहरु, राजश्री टंडन ह्यांनी भाग घेतला. १९४० मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे दुसरे अधिवेशन नागपुरात भरले होते. १९४२ मध्ये नागपूरमधील असंख्य नागरिकांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. मगनलाल बेगडी ह्यांच्या लाल सेनेने संघर्ष केला. त्यांना त्यामध्ये अटक झाली तर स्वातंत्र्यसैनिक शंकर यांना फाशी झाली. १९५१ मध्ये नागपूर पालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्याच दरम्यान भारतीय जनसंघ या पक्षाची (आत्ताचा भारतीय जनता पक्ष) स्थापना नागपुरात झाली. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी नागपूर शहर व जिल्हा महाराष्ट्र प्रदेशामध्ये विलीन झाला व नागपुरास उपराजधानीचा दर्जा देण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*