सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला राहण्यासाठी जागा उरली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून सागर १०० योजने मागे हटवला आणि कोकणची ही देवभूमी निर्माण केली, असे पुराणकथांत म्हटले आहे. त्याच कोकणातील एक भाग म्हणजे रत्नागिरी जिल्हा. ‘रत्नागिरी’ या नावाबद्दल अनेक कथा-दंतकथा प्रचलित आहेत. त्यांपैकी काहींची माहिती पुढे दिली आहे.
तर्क १- रतनगिरी नावाचे साधू विजापूरहून येथे आले होते. त्यांच्या नावावरून रत्नागिरी नाव पडले असे साधारणपणे मानण्यात येते. त्यांची समाधी रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे.
तर्क २ – रत्नदूर्ग किल्ल्यावर जी भगवती देवी आहे तिने रत्नासूर नामक दैत्याचा वध केला व ह्या डोंगरावर विसावली. देवी ज्या डोंगरावर विसावली त्या डोंगराचे नाव रत्नगिरी व त्यातूनच पुढे या परिसराचे रत्नागिरी नाव झाले असावे.
समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले. ब्रिटिश कालखंडात येथे अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. लोकमान्य टिळकांचा जन्म, थिबा राजाची कैद, सावरकरांचा बंदिवास, तत्कालीन अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश या त्यांपैकी काही ठळक ऐतिहासिक घटना म्हणून सांगता येतील.
Leave a Reply