वर्धा या नदीच्या नावावरूनच ‘पालकवाडी’ या छोट्या गावापासून विकसित झालेल्या भागाला ‘वर्धा’ हे नाव देण्यात आले. या जिल्ह्याच्या परिसरावर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकारम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व गोंड या राजवटींची सत्ता असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजातंत सापडतात. निजाम व नागपूरकर भोसले (रघुजी भोसले) यांचाही अंमल काही काळ या भागावर होता.
दरम्यान १९३४ मध्ये महात्मा गांधींनी वर्धा तालुक्यातील शेगाव हे ठिकाण आपल्या कार्यासाठी निवडले. हेच गाव पुढे सेवाग्राम या नावाने ओळखले जाऊ लागले. सेवाग्राममधूनच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी गांधीजी मार्गदर्शन करत व त्या संबंधातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय याच आश्रमातून घेण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला येथूनच दिशा मिळाली. ‘भारत छोडो’ आंदोलनाचा जन्मही सेवाग्राममधूनच झाला. राजकीय, सामाजिक व धार्मिक विषयांवर चर्चा करण्यासाठी अनेक महनीय लोकांनी सेवाग्रामला भेट दिली. डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना आजाद, पं. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, राममनोहर लोहिया ,इंदिरा गांधी हे त्यातील काही प्रमुख नेते होत. वर्धा जिल्ह्याचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आष्टी तालुका. हा तालुका भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत आहे. ‘ती’ घटना ‘आष्टी-चिमूरचा’ लढा या नावानेही प्रसिद्ध आहे. येथील शहीद स्मारक या घटनेची साक्ष देते व येथे दरवर्षी नागपंचमी (१६/०८/१९४२ – नागपंचमीचा दिवस) हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.
१९४० मध्ये वर्धा येथे एका सभेवरील गोळीबारात श्री. जंगललुजी ढाले व श्रीमती चिन्नाबाई हे दोघे हुतात्मा झाले. आष्टी, आर्वी या भागात १६ ऑगस्ट, १९४२ पासून मोठा लढा सुरू झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही या लढ्यात सहभागी होते. या प्रसंगी ६ सत्याग्रही गोळीबारात बळी पडले. पुढील काळात १० स्वातंत्र्य सैनिकांना फाशी देण्यात आले. या लढ्यात एकूण ११२ लोकांवर खटले भरण्यात आले. तुरुंगातील हालअपेष्टांमुळे ४ क्रांतिकारकांचा मृत्यू झाला. हा स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचा अध्याय मानला जातो. मौर्य राजवटीपासून ब्रिटिशांपर्यंत इतिहास लाभलेला वर्धा जिल्हा १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचा एक घटक बनला.
Leave a Reply