हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुण्यात व्यतीत केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ :शहर पुणे, खंड-२,पृष्ठ ५७६) या दिवशी जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणा, राजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, भोर, वेल्हे, मावळ व मुळशी हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्र्वनाथ यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकीर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य आणि सुसज्ज वास्तु बांधली.
थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रज तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईच्या काळातील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
Leave a Reply