कोकणचा मेवा – ओळख

उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, गणपतीपुळे, मुरुड, केळशी, भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यावर परतीचा प्रवास गोड करण्यासाठी आणि या आनंददायी सफरीच्या आठवणी घरापर्यंत पोहचविण्यासाठी सोबत असतो तो कोकणचा मेवा…आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.

रत्नागिरी जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून दाट वनराई आढळते. डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची फळझाडे चांगल्या प्रकारे उभी राहतात. भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना कोकणी माणसाने फळबागा उभ्या केल्यात. सोबत डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात निसर्गत: येणाऱ्या करवंद आणि जांभूळाच्या झाडांमुळे विपूल प्रमाणात फळे उन्हाळ्यात बाजारात येतात.

कोकणात मिळणाऱ्या या मेव्यामुळे उन्हाळ्यातली ही सफरही आनंददायी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तिकडे हा मेवा पाठविण्यासाठी कुरिअरची मदतही घेतली जाते. कोकणी मेव्याने रोजगाराची आणि तेवढ्याच ‘मधूर’ संबंधाची अशी साखळीच तयार केली आहे. ‘कोकणच्या राजा’ ने रत्नागिरीचे नाव सर्वदूर पोहोचविले असले तरही कोकणचा इतरही मेवा सर्वांच्या पसंतीस उरला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*