लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हिया ला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे.
ऐतिहासिक काळापासून अनेक साम्राज्यांचा भूभाग राहिलेल्या लात्व्हियाने पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु केवळ २२ वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर १९४० साली सोव्हियेत संघाने लष्करी आक्रमण करून हा भूभाग बळकावला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीची लात्व्हियावर सत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सोव्हियेत संघाने पुन्हा येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले व लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची स्थापना केली. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर लात्व्हिया पुन्हा एकदा स्वतंत्र झाला.
स्वतंत्र झाल्यानंतर लात्व्हियाने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. सध्या लात्व्हिया एक प्रगत देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३व्या क्रमांकावर आहे. २००८-२०१० दरम्यानच्या जागतिक मंदीदरम्यान प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लात्व्हियाची अर्थव्यवस्था युरोपियन संघामध्ये सर्वात वेगाने वाढली. सध्या लात्व्हिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपियन संघ, युरोपाची परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डब्ल्यू.टी.ओ. इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
लात्व्हिया उत्तर युरोपामध्ये बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील ६४,५८९ चौरस किमी भूभागावर वसला असून ह्यापैकी ३४,९६४ चौरस किमी जमीन घनदाट जंगलाने व्यापली आहे. लात्व्हियाची सीमा एकूण १,८६६ किमी लांब असून ह्यापैकी ४९८ किमी सागरी सीमा आहे. दौगाव्हा ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी लात्व्हियाच्या रिगा येथे बाल्टिक समुद्राला मिळते.
लात्व्हियामध्ये जवळजवळ समान कालखंडाचे चार भिन्न ऋतू अनुभवायला मिळतात. लात्व्हियाचे हवामान सौम्य व थंड स्वरूपाचे असून येथील हिवाळे तीव्र तर उन्हाळे शीतल असतात. हिवाळ्यांमध्ये किमान तापमान -३० °से पर्यंत जाते व मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.
बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले. १६०० मध्ये लॅटव्हियाची पोलंड व स्वीडनमध्ये विभागणी झाली. १८व्या शतकात हा प्रांत रशियाशी जोडला गेला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लॅटव्हिया स्वतंत्र झाला. १९४१ मध्ये लॅटव्हियावर जर्मनीने ताबा मिळवला. त्यानंतर हा प्रदेश पुन्हा रशियाला जोडला गेला. १९९१ मध्ये रशियाचे विभाजन झाल्यावर लॅटव्हिया पुन्हा स्वतंत्र झाला.
राजधानी व सर्वात मोठे शहर :रिगा
अधिकृत भाषा :लात्व्हियन
राष्ट्रीय चलन :युरो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply