राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेश हीच ओळख आपल्याला माहित आहे. राजस्थानला मरूभूमी म्हणजे वाळवंटांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. मात्र या वाळवंटातही हिरवाईने तसेच धबधब्याने नटलेले असे एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. चितोड राजमार्गावर बुंदीपासून १०० किमी अंतरावर मेणाल हे छोटेसे पर्यटनस्थळ वसले आहे.
मेणाल हे येथील मेणाल नदी, तिच्यावरचा धबधबा आणि शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. चारीबाजूंनी दाट झाडीने नटलेले मेणाल पर्यटकांना इतिहास, पुरातत्व, पर्यटन याबाबतीत खुश करते.
या छोट्याशा गावात ग्रॅनाईट खडकांवर आदळणारा मेणाल नदीवरचा धबधबा आहे. नदीच्या काठावरच महानाळेश्वर मंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे. घोड्याच्या नालाचा आकाराचा धबधबा व शिवमंदिर परिसरातील अनेक छोटी मंदिरे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य. १०-११ व्या शतकातील ही मंदिरे व मुख्य शिवमंदिर अजमेरच्या चौहान वंशातील राजांनी बांधल्याचे सांगितले जाते.
महानाळेश्वर मंदिरात छत्रीखाली महाकाय नंदी आहे आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, अप्सरा, हत्ती, वाघांच्या मूर्ती कोरल्या आहेत. येथे कोरलेली वेलबुट्टी तर अप्रतिमच आहे.
बुंदीपासून जवळच तारागढ, बुंदी महाल, रानीजीकी बावडी ही स्थळेही आहेत. मेणालमध्ये राहण्याची व्यवस्थाही चांगली आहे.
Leave a Reply