नामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियाच्या उत्तरेला अँगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इ.स. १८८४ साली ओटो फॉन बिस्मार्कच्या नेतृत्वाखालील जर्मन साम्राज्याने येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होती. जर्मनीचा पराभव झाल्यानंतर इ.स. १९२० साली लीग ऑफ नेशन्सने नामिबियाचा ताबा दक्षिण आफ्रिकेकडे दिला. इ.स. १९६६ साली येथे स्वातंत्र्यचळवळ चालू झाली. पुढील २३ वर्षे स्वातंत्र्ययुद्ध चालू राहिल्यानंतर अखेरीस १९९० साली दक्षिण आफ्रिकेने नामिबियाला स्वातंत्र्य मंजूर केले.
नामिबिया नामिब व कालाहारी ह्या वाळवंटांदरम्यान वसला असून येथील बव्हंशी भूभाग रूक्ष ते अतिरूक्ष प्रकारात मोडतो. ह्या कारणास्तव नामिबिया हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे प्रति चौरस किमी केवळ २.५ लोक राहतात. सध्या येथे लोकशाही सरकार असून नामिबियाला राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. नामिबिया संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ, राष्ट्रकुल परिषद इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :विंडहोक
अधिकृत भाषा :इंग्लिश, जर्मन, आफ्रिकान्स, क्वांगाली, लोझी, त्स्वाना, खोईखोई, हेरेरो, ओवांबो
राष्ट्रीय चलन :नामिबियन डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply