नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर्वात मोठे शहर आहे.
१९व्या शतकापासून ब्रिटिश साम्राज्याची वसाहत राहिलेल्या नायजेरियाला १९१४ साली उत्तर व दक्षिण भाग एकत्रित करून एकसंध बनवण्यात आले. १ ऑक्टोबर १९६० रोजी नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाले व तीन वर्षांनंतर नायजेरिया प्रजासत्ताक बनला. १९६७ ते १९७० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते. स्वातंत्र्यानंतर आजवर नायजेरियामध्ये आलटून पालटून लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे व लष्करी राजवटी सत्तेवर राहिल्या आहेत. ओलुसेगुन ओबासान्जो हा लष्करी अधिकारी १९७६ ते १९७९ व १९९८ ते २००७ दरम्यान नायजेरियाचा राष्ट्रप्रमुख राहिला आहे. सध्या नायजेरिया संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ, ओपेक इत्यादी अनेक महत्त्वाच्या जागतिक संघटनांचा सदस्य आहे.
२०१३ साली सुमारे १७.४ कोटी इतकी लोकसंख्या असलेला नायजेरिया आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा तर जगातील सातव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. १ लाख कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक उलाढाल असलेली नायजेरियाची अर्थव्यवस्था २०१४ साली दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून आफ्रिकेमध्ये पहिल्या स्थानावर तर जगात विसाव्या स्थानावर पोचली. अमेरिकेमधील एका संस्थेने तयार केलेल्या मिंट (MINT): मेक्सिको, इंडोनेशिया, नायजेरिया व तुर्कस्तान) ह्या ब्रिक्स सारख्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या जगातील राष्ट्रांच्या यादीत नायजेरियाचा समावेश केला गेला आहे. खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये जगात १२व्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाची अर्थव्यवस्था तेल उद्योग व कृषीवर अवलंबून आहे.
२००२ सालापासून बोको हराम नावाची इस्लामिक अतिरेकी संघटना नायजेरियाच्या उत्तर भागात थैमान घालत आहे. आजवर बोको हरामने केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे १२,००० लोक बळी पडल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अबुजा, लागोस
अधिकृत भाषा :इंग्लिश, हौसा, इग्बो, योरुबा
राष्ट्रीय चलन :नायजेरियन नाइरा (NGN)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply