कतार (अरबी: قطر) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१४ साली कतारची लोकसंख्या सुमारे २१ लाख होती ज्यापैकी केवळ ११ टक्के लोक कतारी नागरिक होते व उर्वरित सर्व रहिवासी येथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत.
प्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.
वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे. अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. २०२२ फिफा विश्वचषकासाठी कतारची यजमानपदी निवड झाली आहे. अल जजीरा, कतार एअरवेज इत्यादी कतारी कंपन्या झपाट्याने वाढत आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :दोहा
अधिकृत भाषा :अरबी
स्वातंत्र्य दिवस : ३ सप्टेंबर १९७१ (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन :कतारी रियाल
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply