सज्जनगड

Sajjangad - A place where Ramdas Swami resided

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे. रामदासी पंथांचे माहाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. समर्थ रामदासानी स्थापन केलेल्या १९ पैकी २ मारुतींची मंदिरे येथे आहेत. या मंदिरला राज्यातील लाखो भक्त मोठ्या श्रध्देने भेट देतात.

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच आहे, तर पठारापासून १००० फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. याच्या पश्चिमेस खेड – चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे.

या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९, पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजी महाराज सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

१८ जानेवारी १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० रोजी फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ‘नवरससातारा’ म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*