विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकटस्थान. देश विदेशातील हजारो श्री भक्तांची येथे दररोज हजेरी असते.
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. स्टेशनपासून मंदिर पायी फक्त १५ मिनिटांवर आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येथे बसेस येतात.
श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.
भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरातच भव्य ‘भक्त निवास’ बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात मुक्कामाची व्यवस्था उपलब्ध आहे. येथे भोजनाचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाप्रसाद दिला जातो.
श्री गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच जवळच असलेल्या आनंदसागर उद्यानालाही भाविक भेट देतात. हे अतिशय सुंदर उद्यान आहे.
Leave a Reply