थेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.
पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसरच्या नंतर लोणीच्या पुढे ३ किमी. अंतरावर डाव्या बाजूला थेऊर फाटा आहे. पुणे-थेऊर एकूण अंतर २५ किमी. आहे.
गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले असे म्हणतात. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.
श्री चिंतामणीच्या या भव्य मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील ही एक. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत.
वयाच्या २७ व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाल्यावर येथे आणण्यात आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. रमाबाईंच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे.
मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.
Leave a Reply