प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक म्हणजे मुंबईतील गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही या मंदिरात भक्तांची सतत रिघ लागलेली असते.
या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती ही चतुर्भूज असून वरच्या दोन हातात अंकुश व कमळ, खालच्या डाव्या हातात जपमाळ व उजव्या हातात मोदक आहे. दोन्ही बाजूस ऋद्धि-सिद्धी असून मुद्रा अतिशय प्रसन्न व मोहक आहे. मूळ मूर्ती काळ्या दगडाची आहे पण ती रंगविण्यात आली आहे.
मुंबईतील पश्चिम व मध्य रेल्वेच्या मार्गावरील दादर रेल्वे स्थानकावरून पायी गेल्यास पंधरा मिनिटांवर हे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात जाणार्या बसेस मिनिटामिनिटाला मिळू शकतात. दादर पश्चिमेला उतरुन फुलमार्केटजवळून शेअर टॅक्सीची सोय आहे. मुंबईच्या विविध भागातून प्रभादेवी येथे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे. दादरप्रमाणेच एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरून परेल एस.टी.डेपोजवळून सरळ चालत गेल्यास लेनीनग्राड चौकानंतर येणार्या साने गुरुजी उद्यानाच्या एका बाजूस हे मंदिर आहे.
मंगळवार, चतुर्थी आणि गणेश उत्सवाच्या दिवशी किलोमीटरभर लांबीच्या भक्तगणांच्या रांगा येथे लागतात. उत्सवांच्या दिवशी काही लाख लोक लांबलांबहून दर्शनासाठी येतात. या मंदिरात नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठीही पायी येणार्यांची संख्याही मोठी आहे.
पूर्वी येथे पुरातन बांधणीचे मंदिर होते. सध्या मंदिराचे रूप आमूलाग्र बदललेले आहे. मूळ गर्भगृहातील मूर्ती तशीच ठेवून सहा मजली अत्यंत आकर्षक बहुकोनाकृती इमारत बांधली. कोनाकृती भागाच्या वरच्या टोकास कळस आहे. मुख्य मंदिराच्या मधोमध सोन्याचा कळस असून बाजूचे काही छोटे कळस सोन्याचे तर काही पंचधातूचे आहेत. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत.
सिद्धिविनायक मंदिराची अधिक माहिती घेण्यासाठी मंदिराची वेबसाईट पहा. मात्र ही वेबसाईट संपूर्णपणे इंग्रजीत आहे.
Leave a Reply