श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक हे अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मंदिर व मूर्ती उत्तराभिमुख आहेत. मूर्ती स्वयंभू, उजव्या सोंडेची आणि गजमुखी असून ती तीन फुट रुंद आहे. सिद्धिविनायकाने येथे एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सुर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे.
रेल्वेने सिद्धटेकला जाण्यासाठी सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौंडहून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.
दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)
Leave a Reply