सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी.२ (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.
सिंगापूर बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८१९ साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील सिंगापूर नदीच्या मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. ओरांग लाउट जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर मसाला मार्गावरील महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; ब्रिटिश साम्राज्यातील सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले.
सिंगापूर हे आजचे इंग्रजी नाव मूळ मलय सिंगपूरा वरून आले. यातला सिंग हा संस्कृत सिंह आणि पुरा हे संस्कृत पुरमचे स्थानिक रुप असल्याचे मानले जाते. म्हणजेच सिंहपुरम या मूळ नावाचे रूप बदलत जाऊन ते सिंगापूर झाले आहे.
सिंगापुरात मुख्य भूमी धरून ६३ बेटे आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर मलाय द्वीपकल्पाला जोडले आहे. जोहोर-सिंगापूर कॉजवे हा पूल सिंगापुराला उअत्तरेकडच्या जोहोर नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो; तर तुआस सेकंड लिंक हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो. जूरोंग बेट, पुलाउ तेकोंग, पुलाउ उबिन व सेंटोसा ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून बुकित तिमा ही १६६ मी. (५४५ फूट) उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :सिंगापूर शहर
अधिकृत भाषा :इंग्लिश, मलाय, चिनी, तमिळ
राष्ट्रीय चलन :सिंगापूर डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply