हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे. परंतु उजनीच्या धरणामुळे जिल्ह्यात बागायती उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सोलापूर जिल्हा ‘ज्वारीचे कोठार’ मानला जातो. येथील ‘मालदांडी जातीची ज्वारी अतिशय रुचकर आणि लोकप्रिय आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. रब्बी मोसमातल्या ज्वारीखालील क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर आहे. खरीप ज्वारीचे क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. १९९० मध्ये आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. या जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी असूनही डाळींब, बोर, आंबा, सीताफळ, आवळा, जांभूळ यांच्या फळबागा विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली जात आहे. मोहोळ, पंढरपूर इ. तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
Leave a Reply