सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे.
Leave a Reply