सोलापूर – इतिहास

इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्‍हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) स्वतंत्र झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन केसरी मध्ये आढळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*