पंढरपूर – दक्षिणेची काशी म्हणून संबोधल्या जाणार्या पंढरपूरमुळे सोलापूर जिल्हा धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. येथे विठ्ठल व रुक्मिणीची मंदिरे वेगवेगळी आहेत. विठ्ठल मंदिर हे शिल्पकलेचा उत्तम नमुनाही मानले जाते.
मंगळवेढा – सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे श्री दामाजीपंतांचे मंदिर आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अर्धनारी नटेश्र्वराचे एकमेवाद्वितीय असे हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. बाराव्या शतकात यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेल्याचा उल्लेख आढळतो.
हत्तरसंग कुडल – दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथे भीमा-सीना संगम झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे हे आज जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे संगमावर अकराव्या शतकात बांधलेली (कोरलेली) हरिहरेश्र्वर व संगमेश्र्वर ही अजिंठा-वेरूळची लेणी वेरुळच्या शिल्पकलेशी साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत. या ठिकाणी उत्खननात जगातील एकमेव असे दुर्मीळ शिवलिंग सापडलेले आहे. या ४ फुटी शिवलिंगावर शिवाची ३५९ मुखे व अन्य मूर्ती कोरल्या आहेत. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अनेक दरवाजे ओलांडून सूर्यकिरणे शिवलिंगावर पडतात.
बार्शी येथील विष्णू मंदिर – भारतात विष्णूची मंदिरे अतिशय कमी ठिकाणी आहेत. या जिल्ह्यात ते बार्शी येथे आहे. या हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिरामुळे बार्शीला भगवंताची बार्शी म्हणतात.
करमाळा येथील भुईकोट किल्ला – करमाळा येथे प्रसिद्ध भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापुरात बांधला गेलेला भुईकोट किल्ला हे जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य. किल्लाबांधणी शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधला गेल्याचे इतिहासकार सांगतात. १६८५-८६ या काळात औरंगजेब सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात.
नान्नज येथीक माळढोक अभयारण्य – जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव) पक्षी अभयारण्य – ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. कंबर तलाव येथे किमान ६५ प्रजातींचे पाण- पक्षी पहावयास मिळतात. मध्य आशिया , सैबेरिया, चीन आणि युरोपमधून सुमारे ९४ प्रकारचे पाणपक्षी स्थलांतर करून येथे येतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ कै. सलीम अली यांचे हे आवडते ठिकाण होते.
माचणूर – सोलापूर- मंगळवेढा मार्गावर भीमा नदीच्या तीरावर माचणूर येथे प्राचीन महादेव मंदिर आहे.
Leave a Reply