जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी आहे. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे. काही कंपन्या आपल्या मालाची १००% निर्यातही करतात. सोलापूर शहर व आसपासच्या भागात विडी उद्योग अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उद्योग आहे. सुती कापड उद्योग व विडी उद्योग यांमध्ये प्रामुख्याने तेलुगू भाषिक विणकर समाजाचा मोठा वाटा आहे. दूध डेअरी, कृषिप्रक्रिया उद्योग, गोमय उत्पादने व साखर कारखाने या उद्योगांच्या माध्यमातून लोकमंगल हा उद्योग जिल्ह्यात अनेकांचे रोजगाराचे साधन बनत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सूत गिरण्या आहेत. कॅम शॅफ्ट्स बनवणारा प्रिसिजन उद्योग जिल्ह्यातील प्रमुख उद्योग बनू पाहतो आहे. केम येथील हळदीपासून बनवले जाणारे कुंकू प्रसिद्ध असून पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
Leave a Reply