दक्षिण कोरिया हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व चोसून घराण्यांनी कोरियावर इ.स. १८९७ पर्यंत राज्य केले. १८९७ ते १९१० दरम्यान हा प्रदेश कोरियन साम्राज्य ह्या नावाने ओळखला जात असे. २२ ऑगस्ट १९१० रोजी जपानी साम्राज्य व कोरियन साम्राज्यांदरम्यान झालेल्या तहानुसार जपानने सर्व कोरियावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर जपानची सत्ता होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास सोव्हियेत संघाचा तर दक्षिण भागास अमेरिकेचा पाठिंबा होता. सोव्हियेत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या युद्धाची परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.
सध्या आशियामधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटना व जागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :सोल
अधिकृत भाषा :कोरियन
राष्ट्रीय चलन :दक्षिण कोरियन वोन
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply