श्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
श्रीलंकेचे क्षेत्रफळ ६५,६१० चौरस किलोमीटर असून लोकसंख्या २ कोटी ७ लक्ष आहे. देशातील ७५% जनता ही बौद्ध धर्मीय आहे.
प्राचीन काळापासून हा देश ‘सिंहल’ या नावाने ओळखला जात असे. भारतीय साहित्यात या देशाला ‘लंका’ असेही म्हटले जाई. ब्रिटीश राजवटीमध्ये याला ‘सिलोन’ असे नाव पडले. इ.स. १९७२ पर्यंत हा देश ‘सिलोन’ या नावानेच ओळखला जाई. नंतर याचे नाव श्रीलंका असे ठेवले गेले. इ.स. १९७८ या वर्षी याचे नाव ‘श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक ‘ असे ठेवले गेले.
भारतीय हिंदू साहित्यात या देशाचे नाव अनेकदा येते. रामायणामधील रावण हा लंकेचा राजा होता. तसेच प्राचीन काळापासून भारत आणि श्रीलंकेचे धार्मिक, व्यापारी व राजकीय संबंध होते.
इ.स.पू. २५० पासूनच श्रीलंकेत बौद्ध धर्म व संस्कृतीचा प्रचार होण्यास सुरुवात झाली. मौर्य सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र व पुत्री संघमित्रा यांस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता लंकेत पाठविले होते. गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्याची एक फांदी घेऊन ख्रिस्तपूर्व २४५ मध्ये संघमित्रा या देशात आल्या आणि त्यांनी ती फांदी येथे रोवली. हे जगातील सर्वात प्राचीन वृक्षारोपण समजले जाते. तसेच सम्राट अशोकाने पाठवलेले बौद्ध भिक्खु येथे आले होते व त्यांनी येथे बौद्ध धर्माची सुरुवात केली. त्यांचे अस्तित्व अनुराधापूरच्या वायव्य भागात आजही स्पष्ट दिसते.
चहा, कॉफी, नारळ, रबर व मुळात श्रीलंकेची असलेली दालचिनी या पदार्थांच्या निर्यातीसाठी श्रीलंकेची ख्याती आहे. उष्णकटिबंधीय वने, समुद्रकिनारे यांमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य हे पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंकेचे आकर्षण आहे. येथे नैसर्गिक मौल्यवान खड्यांच्या खाणी आहॆत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :श्री जयवर्धनेपुरा कोट, कोलंबो
अधिकृत भाषा :सिंहला, तमिळ
राष्ट्रीय चलन :श्रीलंकी रूपया
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply