स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी – म्हणजे राज्यांनी – बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.
पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम येथेच झाला.
स्वित्झर्लंड युरोप खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित असून त्याच्या भोवताली जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंडचा दक्षिण व आग्नेय भाग आल्प्स पर्वताने व्यापला आहे. ऱ्हाइन व ऱ्होन ह्या युरोपामधील दोन प्रमुख नद्यांचा उगम स्वित्झर्लंडमध्ये होतो. जिनिव्हा हे मोठे सरोवर देशाच्या नैऋत्य भागात फ्रान्सच्या सीमेवर तर बोडनसे हे सरोवर ईशान्य भागात जर्मनी व ऑस्ट्रिया देशांच्या सीमेजवळ स्थित आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :बर्न, झ्युरिक
अधिकृत भाषा :जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्श
राष्ट्रीय चलन :स्विस फ्रँक
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply