लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर या सारखी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. लातूर-आंबेजोगाई रस्त्यावर लातूरपासून आठ कि.मी. अंतरावर मांजरा नदीकाठी महापूर येथे नमानंद महाराजंचा मठ आहे.

मराठे व निजाम यांच्या लढाईचे साक्षीदार असणारे उदगीर शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध असून किल्ल्याभोवती असणारा ४० फूट खोलीचा खंदक आणि जमीन पातळीपासून ६० फूट खोलीवरील श्रीउदयगीर महाराजांची समाधी हे येथील मुख्य आकर्षण आहे. उदगीरचा जनावरांचा बाजार देवणी जातीच्या वळूंसाठी प्रसिद्ध आहे.येथून जवळच असणार्‍या देवर्जन येथे श्रीगंगाराम महाराजांची समाधी आहे.

औसा येथील मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील श्रीबीरनाथ महाराजांचे देऊळ, श्रीमल्लिनाथ महाराजांचा मठ व औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे. औसा तालुक्यातील खरोसा या गावातील हिंदू व बौद्ध लेण्यांमधील शैव पद्धतीची शिल्पे प्रेक्षणीय आहेत. जिल्ह्यातील चाकूर शहरापासून जवळच श्री सत्य साईबाबांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले असून सदर ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून वेगाने विकसित होत आहे. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील दुर्मीळ औषधी वनस्पतींची टेकडी प्रसिद्ध आहे.

उपरोक्त स्थानांबरोबरच निलंगा येथील नीलकंठेश्वराचे (महादेवाचे) मंदिर व स्वयंभू शिवलिंग तसेच येथील शाह पीर पाशा कादरी ह्यांचा दर्गा उजना येथील श्रीगणेशनाथ यांची समाधी व रेणापूर येथील रेणुकादेवीचे मंदिर आणि या परिसरातील हलणारी दीपमाळ ही जिल्ह्यातील ठिकाणे जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*