रामटेक – नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी अख्यायिका आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. येथे महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले असून प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. येथील रामसागर, अंबाला तलाव प्रसिध्द आहे. नागपूर येथील सीताबर्डीचा किल्ला ही प्रेक्षणीय आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी दीक्षाभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार केला. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. नागपूर हे बौध्द धर्मीयांचे आदराचे स्थान असून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व बौद्ध स्तूप उभारण्यात आला आहे. अदासा येथील गणपतीचे जागृत पुरातन देवस्थान, अंबोला येथील चैतन्येश्वर मंदिर आणि श्री हरिहर स्वामींची समाधी, काटोलमधील भवानी मंदिर ही जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. तसेच धापावाडा येथे श्री कोतोबा स्वामींचा मठ असून येथील विठ्ठल मंदिरामुळे हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिध्द आहे.
कामठीमध्ये भव्य ड्रॅगन प्लॅनेट टेंपल आहे. येथील बुध्द मूर्ती जपानतर्फे भेट मिळाली असून मूर्ती पूर्ण चंदनाची व ८६४ किलो वजनाची आहे. जिल्ह्यातील नागार्जुन टेकडी हा आयुर्वेदीक औषध वनस्पतींनी संपन्न असलेला परिसर आहे. तसेच जिल्ह्यातील पारशिवनी येथील शिवगड हा किल्ला प्रसिध्द आहे. मराठीतील लोकप्रिय नाटककार राम गणेश गडकरी यांचे खिंडसी (तालुका सावनेर) येथे १९१९ मध्ये निधन झाले. येथेच त्यांचे स्मारक विकसित करण्यात आले आहे.
पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान – (व्याघ्र प्रकल्प, पेंच ,नागपूर.) पवनी गावापासून २० कि.मी. अंतरावर हा व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधण्यात आले आहे. या २५७.९८ चौ. कि.मी. क्षेत्राच्या उद्यानास १४ नोव्हेंबर, १९९० मध्ये पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले. उद्यानात वाघ, बिबळ्या, रानगवे, रानम्हशी, रानडुकरे, अस्वले इत्यादी हिंस्र प्राणी आणि काही वन्यजीव आढळतात. तसेच बोर येथील अभयारण्याने जिल्ह्याचा काही भाग व्यापला आहे. जिल्ह्यात सेमीनरी हिल व रामटेक येथेही वनोद्याने आहेत.
Leave a Reply