नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

प्रकाशे – नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तापी व गोमाई या नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्रावर झालेला असून केदारेश्र्वर, संगमेश्र्वर ही महादेव मंदिरे प्रसिद्ध आहेत.
सांगरखेड येथील दत्त मंदिर – शहादा तालुक्यातील सारंगखेड येथील दत्त मंदिर प्रसिद्ध असून येथील दत्त जयंती यात्रेला महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात येथून भाविक दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील तळोदा येथील कालिका देवीचे मंदिर व तेथील यात्राही प्रसिद्ध आहे.
गरम पाण्याचे झरे – शहादा तालुक्यात उपणदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. कडक थंडीच्या काळातही हे झरे आटत नाहीत. श्रीरामचंद्रांनी मारलेल्या बाणामुळे हे झरे निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील फत्तेपूर किल्ला व अक्का राणीचा किल्ला हे किल्लाही प्रसिद्ध आहेत.
तोरणमाळ येथील थंड हवेचे ठिकाण – महाबळेश्र्वरनंतरचे राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ या जिल्ह्यात आहे. सात खेड्यांनी बनलेला हा परिसर नंदूरबारपासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर आहे. अक्राणी तालुक्यातील डोंगराळ भागात हे ठिकाण असून समूद्रसपाटीपासून ११४३ मी. उंचीवर वसलेले आहे. प्राचीन काळी मांडू घराण्याच्या राजधानीचे हे ठिकाण होते, तसेच हे नाथ संप्रदायाचे पवित्र स्थळ असून येथे गोरक्षनाथांचे मंदिर व मच्छिंद्रनाथांची गुंफा आहे. याच परिसरात यशवंत तलाव व कृष्णकमळ तलाव आहेत. कृष्णकमळ हा नैसर्गिक तलाव असून यात असंख्य कमळे आहेत. तोरणमाळ परिसरातील आदिवासी जीवनही अनुभवण्यासारखे असून येथे नागार्जून मंदिर (गुहेतील अर्जूनाची मूर्ती) व सीताखाई ही ठिकाणे आहेत. श्रीराम व सीता रथातून या भागातून जात असताना, रथामुळे गुहा निर्माण झाली असे मानले जाते. या गुहेस सीताखाई म्हटले जाते. तोरण नावाची फुले येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात व पठारी, सपाट भागाला माळ म्हटले जाते. यावरून या भागास तोरणमाळ म्हटले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*