मुंबई जिल्ह्यातील दळणवळण सोयी

भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले. ‘हार्बर लाईन’ हा रेल्वे मार्ग वाहतुकीस १९१५ मध्ये खुला करण्यात आला. शहरातील अंतर्गत लोकल रेल्वे सेवा १८७० मध्ये सुरू करण्यात आली. कल्याण – छत्रपती शिवाजी टर्मिनस; कर्जत कसारा – छत्रपती शिवाजी टर्मिनस (मध्य रेल्वे) आणि डहाणू, विरार – चर्चगेट (पश्र्चिम रेल्वे) या मार्गांवर अव्याहतपणे स्थानिक रेल्वे सेवा चालू आहे. भारतातील पहिली स्थानिक सार्वजनिक बस वाहतूक सेवा मुंबई येथे दि. १५ जुलै, १९२६ रोजी सुरू करण्यात आली. सध्या बेस्ट कंपनीच्या ३८४० बसेस सेवेत रूजू असून ३६५ मार्गांवर ४० लाख ५० हजार प्रवाशांची ने-आण करतात.

देशातील सर्वात मोठी तार कचेरी मुंबई येथेच आहे. भारतातील सुमारे ५०% तेल वाहतूक, ३५% धान्याची वाहतूक व ३८% इतर मालाची वाहतूक ही मुंबईच्या बंदरांमार्फत होत असल्याने त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. शिवाय भारतीय नौदल सेनेचे ही हे एक प्रमुख केंद्र आहे. सांताक्रूझ येथे १९३१ मधे विमानतळ बांधण्यात आले. अलीकडच्या काळात ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ओळखले जाते. पूर्वी ‘सहार इंटरनॅशनल एअर पोर्ट’ असे याचे नाव होते. जगातील अनेक महत्त्वाच्या शहरांशी या विमानतळाद्वारे मुंबई जोडली गेली आहे. पश्र्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई-आआग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३), मुंबई – अहमदाबाद – दिल्ली (रा. म.क्र. ८); मुंबई-पुणे – बंगळूर – चेन्नई (क्र. ४) हे राष्ट्रीय महामार्ग मुंबईतून सुरू होऊन पुढे जातात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*