चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.
बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे “सावकारी पाश’ या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय.
गोपाळाचं “चंद्रकांत’ असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. “राजा गोपीचंद’ या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी “चंद्रकांत’ हे नाव लावण्यात आलं. “सावकारी पाश’ या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. “सावकारी पाश’ हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.
व्ही. शांताराम यांच्या “शेजारी’ या चित्रपटापासून चंद्रकांत “प्रभात’मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. “युगे युगे मी वाट पाहिली’, “पवनाकाठचा धोंडी’, “संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. “खंडोबाची आण’ या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला.
“रामराज्य’ चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. “स्वयंवर झाले सीतेचे’मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा “ग्राफ’ टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच “रामराज्य’ या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा “बनगरवाडी’ हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट.
चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.
चंद्रकांत मांडरे यांचे उल्लेखनीय चित्रपट :- युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
Leave a Reply