दादरकर, अद्वैत

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व कलेच्या प्रांतात आपला ठसा उमटवलेला अद्वैत दादरकरने मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसार व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत. प्रायोगिक रंगभुमीकडे आज बर्‍यापैकी गर्दी खेचून आणणार्‍या नाट्यकर्मींमध्ये त्याचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते.

डी. जी रूपारेलमध्ये प्रवेश मिळविल्यानंतर खर्‍या अर्थाने त्याच्यामधील प्रतिभावंत अभिनेत्याने व अष्टपैलु दिग्दर्शकाने आपले डोके वर काढले. अनेक अंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधुन भाग घेत, त्याने कित्येक एकपात्री अभिनयाचे खेळ स्वतः लिहून दिग्दर्शित केले. मिथक नावाच्या संस्थेसाठी या अर्जुनाने कित्येक वर्षे कल्पकपणे, व प्रखर निष्ठेने काम करून ढासळणार्‍या प्रायोगिक रंगभुमीचा तोल शिवधनुष्यासारखा सावरून धरला आहे. रूपारेल मध्ये असताना त्याने दिग्दर्शित केलेले एकपात्री प्रयोग या क्षेत्रात उतरू पाहणार्‍या तरूणांसाठी प्रेरणादायी ठरले होते.

हाफपँट, ह्या त्याच्या अतिशय गाजलेल्या एकपात्रीप्रयोगाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. एक मध्यम वर्गीय तरूण नायक आपली कणखर तत्वप्रणाली बनविण्यासाठी स्वतःमधील स्वप्नाळु व अल्लड मुलपणाचा कसा प्रयत्नपुर्वक त्याग करतो हे विवीध भावनांच्या कल्लोळांमधून प्रेक्षकांना दाखविणारी ही हृद्यस्पर्शी कथा आहे. स्वाभिमान करंडक व सवाई एकपात्री प्रयोग स्पर्धेचा निर्विवाद विजेत्या ठरलेल्या या खेळाने अख्खा महाराष्ट्र व त्यातील तमाम सच्च्या नाट्यप्रेमींना, अक्षरशः ढवळून घराबाहेर काढले होते. मायक्रोव्हेव चकणा हा त्याने बसविलेला दोनपात्री प्रयोग, मनोरंजनाचा मसाला असुन देखील प्रभावी आशयामुळे व उत्कंठावर्धक सादरीकरणामुळे आजच्या तरूण मनांचा ठाव घेणारा ठरला. गैरसमजुतीच्या कीडीमुळे इतकी वर्षे जीवापाड जपलेले मैत्रीचे बहारदार पीक कसे नासून जावू शकते हे या प्रयोगामुळे आपल्याला उत्कटपणे समजविणारे नाटक आहे. या नाटकाने झी गौरव या सन्मानित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये तब्बल पाच नामांकने मिळवून आपली चमक दाखवून दिली होती.

याशिवाय बॅरिस्टर या विक्रम गोखले यांनी बसविलेल्या नाटकामध्ये लक्षवेधी अभिनय, उंबरठा या दर्जेदार व खुमासदार नाटकासाठी सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचे बिरूद, पैसा वसुल, जावई माझा भला, संगीत संशय कल्लोळ, आलटुन पालटुन, अलविदा, एक आडवी रेघ, तीच ती दिवाळी, प्रतिबिंब, एक लेखकु लिहीता लिहीता, तसेच डी. बी. मोकाशी यांच्या प्रसिध्द पालखी या कादंबरीवर आधारित असलेले पालखी हे नाटक अशी कित्येक नाटके लिहून व बसवून त्याने प्रायोगिक भुमीच्या गौरवशाली इतिहासाला व परंपरेला पुन्हा उजाळा देणारी नवी लाट आणली आहे. तांत्रज्ञानिक अचुकता व प्रेक्षकांना अंतर्मग्न करून जाणारे व नव्या युगात पारख्या झालेल्या विवीध भाव भावनांना व संवेदनांना आपल्या कवेत घेवून जाणारे आशय यांच्या उत्कृष्ठ मिलाफाने प्रेक्षकांना नयनरम्य व दृष्यरम्य सरींमध्ये चिंब भिजविणारा, व आनंदांच्या लहरींमध्येही असंख्य अप्रकट दुःखांचे व अपेक्षांचे शिंपले त्यांना नकळत वेचावयास लावणारा हा अष्टपैलु कलंदर, रसिकांच्या हृद्यसिंहासनांवर केव्हाच विराजमान झालेला आहे. मिथक ने सुरू केलेला विजय तेंडुलकर उत्सव या त्यांच्या संस्मरणीय नाटकांना नवसंजिवनी देणार्‍या व मानाचा मुजरा करणार्‍या कार्यक्रमामध्येही सारी भिस्त त्याच्यावर सोपविली गेली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*