मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. गरिबीमुळे कधी बस चालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले.
त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी झाला.
१९३०-३२ च्या सुमारास ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला.
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती.
अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
Leave a Reply