अमोल बावडेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. अमोल बावडेकर हे अभिनेता आणि गायक म्हणून ह्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहेत. अमोल बावडेकर ह्यांचे वडील श्री. सुहास बावडेकर हे पं. जितेंद्र अभिषेकी ह्यांचे शिष्य होते. अमोल बावडेकर ह्यांना गायन तसेच अभिनय क्षेत्रात अनेक गुरूंनी घडवलं. गायन क्षेत्रात त्यांना पं. हृदयनाथ मंगेशकर , पं. यशवंत देव , सुरेश वाडकर यांसारखे दिग्गज गुरू लाभले तर अभिनय क्षेत्रात त्यांना प्रभाकर पणशीकर , वामन केंद्रे , अविनाश नारकर अशा कसलेल्या व्यक्तिमत्त्वांचं मार्गदर्शन लाभलं.
अमोल बावडेकर हे नाट्यक्षेत्रातही कार्यरत आहेत. आतापर्यंत अमोल बावडेकर ह्यांनी संगीत कट्यार काळजात घुसली (नाट्यसंपदा) , संगीत गोरा कुंभार , संगीत तुलसीदास , संगीत अवघा रंग एक झाला , संगीत शतजन्म शोधिताना , केदार शिंदे दिग्दर्शित टूरटूर , वामन केंद्रे दिग्दर्शित ती फुलराणी (सुत्रधाराची भूमिका) अशी विविध नाटकांतून अभिनय केला आहे. त्यातील संगीत गोरा कुंभार व संगीत अवघा रंग एक झाला ह्या नाटकांसाठी त्याला उत्कृष्ट अभिनेता हा किताब मिळाला.
चित्रपटसृष्टीत अमोल बावडेकर ह्यांनी मराठीतील हृदयांतर , पांघरुण , भाई – व्यक्ती की वल्ली , गोळाबेरीज , कँडल मार्च , राजमाता जिजाऊ अशा बहुचर्चित चित्रपटांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं. हिंदी चित्रपटसृष्टीत तर त्यांनी बाजीराव मस्तानी ह्या भव्यदिव्य चित्रपटात शिवभट्ट हे पात्र साकारलं आहे.
आतापर्यंत अमोल बावडेकर हे सखा पांडुरंग , तुका आकाशाएवढा , राधा ही बावरी , कुंकू टिकली आणि टॕटू , अहिल्याबाई होळकर , छत्रपती शिवाजी , कृपासिंधू , उंच माझा झोका आणि सध्या सुरू असलेली स्वामिनी ह्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील स्वामिनी ह्या मालिकेतील श्रीमंत नानासाहेब पेशवे हे त्यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरलं.
अशा ह्या गायक आणि अभिनेत्याचा जन्म १ ऑक्टोबर १९७३ रोजी झाला. ह्या कलाकाराचे शालेय शिक्षण चोगले हायस्कूल , बोरिवली येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टस् येथून पूर्ण झाले.
#amol bawdekar
Leave a Reply