अनंत अंतरकर

संपादक, चित्रकार, लेखक

‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली तरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत, हे अंतरकरांच्या वाङ्मयीन द्रष्टेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.

शाळेत असताना अंतरकरांनी ‘विद्याविनोद’ नावाचे एक हस्तलिखित मासिक हौसेने काढले होते. ते पाहून त्यांचे शिक्षक फाटक यांनी ‘हा मुलगा मोठेपणी उत्तम संपादक होईल’ असे भाकीत केले होते.

मराठी नाटके आणि हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती.

सतरा-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. 1930 ते 38 या काळात निरनिराळ्या दैनिकांत व साप्ताहिकांत अंतरकरांनी लेखन, वार्तांकन व संपादन केले. त्यांच्या कविता आणि गद्यलेखन ‘संजीवनी’, ‘विहार’, ‘विविधवृत्त’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रभात’, ‘चित्रा’, ‘आशा’, ‘धनुर्धारी’, आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या चौदा टोपणनावांनी ते हे लेखन करीत असत. याखेरीज ‘आकाशवाणी’साठी ते दर आठवड्याला एक श्रुतिकाही लिहीत असत. ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ ही प्रसिद्ध झालेली अंतरकरांची पुस्तके अभिजात विनोदाचा उत्कृष्ट नमुना म्हणून गाजली.

१९४६ मध्ये ‘हंस’ हे स्वत:चे मासिक सुरू केले. ‘हंस’च्या पाठोपाठ अंतरकरांनी १९५० साली विनोदप्रधान ‘मोहिनी’ची स्थापना केली आणि नंतर चार वर्षांनी १९५४ मध्ये सर्वार्थाने नवलपूर्ण अशा ‘नवल’ या मासिकाचा आरंभ केला.

केवळ ‘नव’संप्रदायात संकुचितपणाने अडकून न बसणाऱ्या लघुकथा, गूढकथा, फँटसी, रहस्यकथा, भयकथा यांसारख्या अनेक नवीन कथाविधांचा विकास मराठीत होऊ शकला तो अंतरकरांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच.

स्वत: सर्जनशील लेखक आणि उत्तम चित्रकार असलेले अंतरकर हे मराठीमधील एक दुर्मिळ, निष्ठावंत संपादक. मराठीत सर्वाधिक पुस्तके ज्यांना अर्पण केली गेली आहेत असे एकमेव संपादक.

मराठी वाचकांची कथाभिरुची संपन्न करणाऱ्या हया द्रष्ट्या संपादकाचे ४ ऑक्टोबर १९६६ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*