काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता. `आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर – टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्वकराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी नंतर आग्रा घराण्याचे अध्वर्यू पं. दिनकर कैकिणी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं. दिनकर कैकिणी यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात. यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कैकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला.
“शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.’
“भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.’
आरती अंकलीकर-टिकेकर यांना आत्तापर्यंत पं. कुमार गंधर्व पुरस्कार, पं. जसराज पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘संहिता’ या मराठी चित्रपटातील ‘पलके ना मूंदो’ या गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे.
Leave a Reply