लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. ‘शतदा प्रेम करावे’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यातील कितीतरी आठवणी अत्यंत रंजक आहेत.
गजाननराव वाटवे त्यांच्या कार्यक्रमात केवळ स्वत: गायलेली गीतेच सादर करीत असत. त्यांचा हा परिपाठ अरूण दातेही पुढे चालवीत होते. केवळ स्वत: गायलेल्या गीतांचाच कार्यक्रम ते सादर करत असत आणि रसिक त्यांची तीच गाणी ऐकायला पुन्हा पुन्हा उत्सुक असत.
यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही.
त्यातूनच ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘सूर मागू तुला मी कसा’, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’ यासारख्या सुंदर रचना दाते यांच्या गळ्यातून थेट रसिकांच्या हृदयात जाऊन पोहोचल्या.
मराठी भावगीतांचे ‘बादशहा’ गजाननराव वाटवे यांच्या नावाने मिळणाऱ्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होण्याचा मान अरूण दाते यांना मिळणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आपल्या भावासारखा असलेल्या आणि भारतीय संगीतात अत्यंत मोलाची भर घालणाऱ्या प्रतिभावान अशा कुमार गंधर्वाकडेच जर स्वरांचे पहिले धडे गिरवण्याची संधी मिळाली, तर त्याचे सोने का होणार नाही?
तरुणपणात मुंबईला टेक्स्टाइल इंजीनिअरची पदवी मिळवण्यासाठी ते जेव्हा गेले, तेव्हा ते गायला लागले आहेत, याचा साक्षात्कार त्यांचे वडील रामूभय्यांना झाला होता. साक्षात पु. ल. देशपांडे यांनीच हे गुपित त्यांच्या कानी घातले होते. त्यामुळे परीक्षेत पहिल्यांदा नापास होण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला,
तेव्हा वडिलांना कसे सांगायचे या चिंतेत असलेल्या अरूण दाते यांना मोठाच धक्का बसला. नापास होण्याबद्दल काही बोलण्याऐवजी रामूभय्या त्यांना म्हणाले, ‘टेक्स्टाइल इंजीनिअर होणारे अनेक जण आहेत, तूही होशील, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते, ते सांग!’ त्यामुळे यशस्वी टेक्स्टाइल इंजीनिअर म्हणून उत्तम कारकीर्द सुरू असताना वयाच्या पन्नाशीत म्हणजे १९८४ मध्ये पूर्ण वेळ भावगीत गायनाला वाहून घेण्याचा, त्यांनी घेतलेला निर्णय रसिकांसाठी फार मोलाचा ठरला.
के. महावीर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत असतानाच १९५५ पासून आकाशवाणीवर गायन सुरू असले, तरीही पदार्पणात रसिकांची भरभरून मिळालेली पावती दाते यांच्या पुढील कारकीर्दीसाठी महत्त्वाची ठरली. १९६२ मध्ये ‘शुक्रतारा मंदवारा’ हे त्यांचे पहिले गीत ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने बाहेर आले आणि त्यानंतर अरूण दाते यांना जराही उसंत मिळालेली नाही.
‘शुक्रतारा’ याच नावाने ते करीत असलेल्या भावगीत गायनाच्या कार्यक्रमाचे जगभरात एकूण २५०० प्रयोग झाले आहेत.
त्यांचे मराठी आणि उर्दूतील पंधरा अल्बम आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
अरुण दाते यांचे दिनांक 6 मे 2018 रोजी मुंबई येथे निधन झाले.
Leave a Reply