‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले.
त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घनश्यान नयनी आला’, ‘बावनखणी’, ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकांबरोबरच ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत विद्याहरण’, ‘रामराज्य वियोग’, ‘संगीत शारदा’ अशा संगीत नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘कान्होपात्रा’ या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. ‘सौभद्रा’त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. ‘मानापमाना’त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. ‘कान्होपात्रा’त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या.
महाराष्ट्र राज्य सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
Leave a Reply