आस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे. त्याचा जन्म पुण्यात दिनांक १६ मे १९८३ रोजी झाला. त्याने त्याचं शालेय शिक्षण महाराष्ट्र मंडळाच्या सेठ दगडूराम कटारिया इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले असून महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फेर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तो मुंबईत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थलांतरीत झाला.
आस्तादला लहानपणापासूनच अभिनयात आणि संगीतात रुची होती. त्यासाठी त्याने ४ वर्षांचा असतानाच शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. तब्बल १५ वर्षे त्याने ही कला शिकून आत्मसात केली. एक सुशिक्षित शास्त्रीय संगीत गायक म्हणून त्याने अनेक संगीत नाटकांमध्ये अभिनय केला. त्याने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरूवात ‘ संगीत लग्न कल्लोळ ‘ ह्या मराठी नाटकापासून केली. त्याने बऱ्याच नाटकांतून अभिनय केला आहे. त्यापैकी कहे कबीर , प्रपोसल हे विशेष लक्ष वेधून घेणारी नाटकं ठरली.
त्याने मालिकासृष्टीत ऊन पाऊस , वादळवाट , असंभव , अग्निहोत्र , सरस्वती आणि पुढचं पाऊल ह्यात अभिनय केला आहे. सध्या तो सोनी मराठी वरील आनंदी – हे जग सारे आणि एक होती राजकन्या ह्या मालिकांमध्ये झळकत आहे. आस्ताद , मराठी बिग बॉस – पर्व पहिले ह्या रियालिटी शो मध्येही प्रेक्षकांना दिसला होता.
आस्तादने मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आतापर्यंत त्याने निरोप , दमलेल्या बाबाची कहाणी आणि प्लॅटफॉर्म आणि बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यातील प्लॅटफॉर्म ह्या चित्रपटात तो मुख्य अभिनेता होता. हा चित्रपट २०११ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
#Astad Kale
Leave a Reply