मुंबई हायकोर्टासह अन्य कोर्टांमध्ये तब्बल ५६ वर्षे वकिली करणारे ख्यातनाम अॅड. चित्तरंजन रामचंद ऊर्फ सी. आर. दळवी यांच्या वकिलीचा प्रारंभ ज्येष्ठ अॅड. व्ही. एम. तारकुंडे यांच्याकडे झाला. रॉयवादी विचारसरणीच्या अॅड. दळवी यांच्यासह दिवंगत ज्येष्ठ अॅड. एम. ए. राणे हेसुद्धा तारकुंडे यांच्याकडे ज्युनिअर होते. तारकुंडे हे नंतर मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. एखाद्या अशिलाचे प्रकरण हाती घेतले की त्याच्याजवळ फी देण्यासाठी पैसे आहेत की नाहीत याचा विचार न करता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अॅड. दळवी आपले वकिली कसब पणाला लावत असत. कामाबद्दल अत्यंत निष्ठा असणाऱ्या अॅड. दळवी यांच्या अभ्यासू वृत्तीमुळेच देसाई हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होऊ शकली. क्रूरकर्मा रामन राघवपासून चुनावाला हत्या, ‘नक्षलवादी’ सुंदर नवलकर अटक अशा अनेक गाजलेल्या प्रकरणात अॅड. दळवी यांचे कौशल्य दिसून आले. सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या अॅड. दळवी यांनी तळागाळातील लोकांसाठीही न्यायालयीन लढा दिला. कोर्टकचेरीच्या चक्रात भरडल्या गेलेल्या कार्यर्कत्यांसाठी त्यांनी जिवाचे रान केले. पहाटेपर्यंत जागत खटल्याच्या बारकाव्यांचा अभ्यास करून ते प्रभावीपणे कोर्टात बाजू मांडत. सुमारे दहा वषेर् ते मुंबई हायकोर्टात सरकारी वकीलही होते. आणीबाणीच्या काळात ‘साधना’ साप्ताहिकावर आलेले दमनचक्र परतवून लावण्यासाठी त्यांनी एकहाती लढा दिला होता. त्याकाळात तुरुंगात असलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्यासाठीही त्यांनी कोर्टात प्रतिनिधित्व केले. त्यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी त्यांच्याकडून त्यांना आणीबाणीतील घडामोडींची माहिती मिळत असे व त्याआधारे ते डावपेच आखत असत. अॅड. दळवी हे काही काळ मुंबई हायकोर्टातील अॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया
चे अध्यक्षही होते. ‘किलोर्स्कर’ मासिकात ‘डॉक्टर जगवतात की नागवतात?’ हा लेख लिहून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांच्या बाजूने अॅड. दळवी यांनी दिलेला लढाही तितकाच गाजला. समाजवादी वर्तुळातील नेते आणि कार्यर्कत्यांचे कायदेशीर सल्लागार असलेले अॅड. दळवी
यांनी पानशेत धरणफुटीप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. वांदे येथे बांधण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ याचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते. त्यांच्यासह त्यांचे स्नेही दिवंगत अॅड. एम. ए. राणे, इंदूताई पारेख आदी मंडळींनी या सेंटरच्या माध्यमातून उपेक्षित व पीडितांचे जीवनमान उंचावण्यासाठी हाती घेतलेल्या कार्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही हातभार लावला. अॅड. दळवी यांच्या वकिलीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हायकोर्टात त्यांचा सत्कार करण्याचे ठरले असता त्यांनी तो नाकारला होता. अत्यंत साधे व प्रसिद्धी पराङ्मुख असलेले दळवी यांच्यातील वकील एखाद्या हाडाच्या शिक्षकासारखाच होता. ते आता या जगात नसले, तरी त्यांचे वकिली क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील.
महाराष्ट्र टाईमसच्या सौजन्याने
Leave a Reply