चंद्रकला कदम

चित्रकार

चंद्रकला कदम यांचा जन्म १५ डिसेंबर १९५७ रोजी झाला.

कुंचल्यातील कला जोपासताना चंद्रकला कदम यांनी साकारलेली चित्रे म्हणजे, जिवंतपणाचाच साक्षात्कार घडवणारी, तर काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून पोलिसांना मदत करत त्यांनी गेली ३५ हून अधिक वर्षे आपली कला समाजकार्य म्हणून जोपासली आहे.

विविध दिवाळी अंक, मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकून ती घराघरांत पोहोचली आणि कलेला दाद मिळवून देणारी ठरली.

चंद्रकला कदम यांचे माहेर अलिबागचे. बालपणी वडिलांसोबत रेवस ते मुंबई हा प्रवास समुद्रातून लाँचने करताना एक-दीड तास बोअर व्हायला व्हायचे, अशावेळी वडील हातामध्ये बाईडिंग केलेल्या को-या पेपरचा बंच द्यायचे. यावेळी अनेक कॅरेक्टर आपसुकच चित्रासाठी मिळायची. अनेक चेहरे आणि त्यांच्या वेगवेगळय़ा हेअर स्टाईल रेखाटताना या प्रवासात जवळपास पन्नास एक चित्र रेखाटून व्हायची.

चित्रे साकारताना ती सहजतेने कलारसिकांना लुभावण्याचे कौशल्य चंद्रकला कदम यांच्या चित्रांतून दिसून येते. चित्रं हुबेहूब वठविण्यासाठी करावी लागणारी मेहनत, रंगसंगती, चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी त्या व्यक्तीचे डोळे, चेह-यावरील हावभाव, त्यांचा पोशाख, त्यांचे व्यक्तिमत्त्व चित्रातून साकारताना चंद्रकला कदम यांच्या कलेचा अप्रतिम दर्जा जिवंतपणाची अनुभूती देऊन जातो.

महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे.

चंद्रकला कदम यांच्या चित्रांची जहांगीर आर्ट, सचिवालय जिमखाना, आदी ठिकाणी भरविण्यात आलेली चित्रप्रदर्शने तसेच चित्रे आणि रेखाचित्रांच्या माध्यमातून सुरू असणारे समाजकार्य पाहता, त्यांचे कार्य वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*