संत, चंद्रशेखर

Sant, Chandrashekhar

Chandrashekhar Sant

माराठी क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर संत हे सुरुवातीच्या काळात अभ्युदय बँकेत नोकरीला होते. मात्र त्या नोकरीत फार काळ त्यांचे मन रमत नसल्यामुळे १९७८ च्या सुमारास ते “महाराष्ट्र टाइम्स” मध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाले; त्यानंतरची तब्बल २५ वर्षे ते “म.टा”त क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’ मध्येही त्यांनी काम केले.

आकाशवाणी व दूरदर्शनवरील सर्व प्रकारच्या खेळांच्या समालोचनामुळं ते महाराष्ट्राला परिचयाचे झाले होते. त्यानंतर आय.बी.एन लोकमत या मराठी वृत्तवाहिनीवरही ते खास क्रीडा विषयक बातम्यांचे विश्लेषण करत होते. क्रिकेट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरावरील क्रिकेटवर त्यांनी विपुल लेखन केले होते. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी असोत वा खेळाडू, संत हे प्रत्येकाच्या संपर्कात असायचे.

क्रिकेटकडे ओढा आणि आवड असली तरी पत्रकार म्हणून देशी खेळांकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. अनेक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने त्यांना वार्तांकनासाठी फिरावे लागत होते. १९८३ सालच्या क्रिकेट विश्वचषकाचे वृत्तांकन करण्यासाठी त्यांनी इंग्लंड दौराही केला होता. कामासाठीचा उत्साह कायम असे. दरवर्षी जानेवारीत आयोजित करण्यात येणाऱ्या मुंबई मॅरेथॉनचे वार्तांकनासाठीही ते भल्या पहाटे हजर राहात असत. चंद्रशेखर संत यांचे कबड्डी सामन्यांचे समालोचन ऐकणे म्हणजे पर्वणीच असे.

महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर देखील पत्रकारितेसाठी त्यांचा ओढा कायम होता. विविध खेळांचे अचूक विश्लेषण, त्याविषयावरील चर्चा आणि लेखन हे सुरुच होते. पत्रकारिता महाविद्यालयातून क्रीडा पत्रकारिता हा विषय शिकवून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भंडार उलगडून बहुमोल मार्गदर्शन केले. कबड्डी खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी काढलेल्या जपान दौर्‍यातही संत सहभागी झाले होते. व्यवसायाप्रमाणेच खेळीमेळीच्या स्वभावामुळे ते अनेक क्रीडा संघटनांच्या विविध पदांवर कार्यरत होते. “स्पोर्टस जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई”चे अध्यक्षपदही चंद्रशेखर संत यांनी भूषविले होते.

१३ नोव्हेंबर २०१४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

(लेखन व संशोधन – सागर मालडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*