कर्वे, चिंतामण गणेश

Karve, Chintaman Ganesh

कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संग्राहक व संपादक चितामण गणेश कर्वे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८९४ सालचा.

शालेय शिक्षण पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर उच्चशिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठात बी. ए. पदवी मिळविली. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोश प्रकल्पात ते काम करू लागले. डॉ. केतकरांसारख्या चतुरस्र, विद्वान, बुद्धिवंतांच्या सहवासात कोश संपादनाचे पहिले धडे कर्वे यांनी गिरविले आणि त्यांनी ज्ञानकोशाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले.
सर्व समावेशक दृष्टी ठेवून अनाग्रही विचाराने तसेच काळाप्रमाणे वृद्धिगत होत जाणार्या ज्ञानाच्या कक्षांचा विचार करून कोशकार्य करायचे असते ह्या डॉ. केतकरांच्या विचारातले मर्म लक्षात घेऊन कर्वे यांनी ज्ञानकोशाच्या कामाचा भार उचलला. ज्ञानकोश पूर्ण झाल्यावर आपल्या काही सहकार्यांसह त्यांनी महाराष्ट्र शब्दकोश १ ते ७ खंड याचीही निर्मिती केली. तसेच महाराष्ट्र वाकसंप्रदाय कोश भाग १ व २ आणि शास्त्रीय परिभाषा कोश इ. महत्त्वाचे कोशग्रंथ प्रसिद्ध केले. यातील ‘शब्दकोश’ हा मराठी भाषेत तयार केलेला पहिला सर्वसमावेशक, व्यापक स्वरूपाचा कोश आहे. या कोशासाठी त्यांनी मराठी भाषा ज्या ज्या प्रांतात बोलली जाते म्हणजेच वर्हाडी, बागलाणी, खानदेशी, कोकणी त्या त्या बोलीभाषेतील शब्दसंग्रह आवर्जून गोळा केले. या शब्दकोशाच्या रूपानी भाषाभिवृद्धींचे संस्मरणीय आणि चिरस्थायी स्वरूपाचे मोठे काम करून ठेवले आहे. कर्वे यांनी काही कोश स्वतंत्रपणे संपादित केले. त्यात सुलभ विश्वकोश भाग १ ते ६, संयुत्त* महाराष्ट* ज्ञानकोश खंड १ आणि २, महाराष्ट्र परिचय इ. कोशनिर्मिती, समाजजीवन, उद्योगधंदे, देवदेवता-पंथ, व्यापार, स्थलदर्शन, शिल्पकला इ. विस्तृत माहिती दिली आहे.
कोशवाङ्मयाखेरीज ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्र’, ‘सुबोधन आणि धर्मचितन’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’ आणि ‘कोशकार केतकर’ इ. ग्रंथलेखनाचा समावश होतो. लोकसाहित्य हा देखील त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता. त्यामुळे लोकसाहित्याचाही त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होता. १९५६ साली महाराष्ट्र शासनाने लोकसाहित्य समितीची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी शासनाने कर्वे यांची सन्माननीय नियुक्ती केली. ज्ञानोपासक, ज्ञानसंग्राहक असलेल्या कर्व्यनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले.
१६ डिसेंबर १९६० रोजी कोशकार कर्व्यांचे निधन झाले.
चिंतामण कर्वे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*