एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. मा.एन. दत्ता हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एन. दत्ता (दत्ता नाईक) यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख:
# Naik, Datta
Leave a Reply