कुलकर्णी, धोंडूताई

कुलकर्णी, धोंडुताई

२३ जुलै १९३७ रोजी कोल्हापूरात जन्मलेल्या धोंडुताईंनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचे शिक्षण सुरू केले होते.धोंडुताईंचे वडील कोल्हापूरमध्ये शिक्षक होते. ते ग्वाल्हेर घराण्याचे चांगले जाणकार होते. वयाच्या आठव्या वर्षां आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात खुपच गाजले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळाली.

त्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात “अल्लादिया खाँ” यांचे पुतणे “त्थन खाँ” यांच्या सुरांनी मंदिरातील पहाट प्रफुल्लित होत असे. हे सूर कानावर पडावेत यासाठी लहानपणीच धोंडूताई मंदिरात जात असत. येथूनच त्यांचा कान आणि संगीता विषयीची जाण तयार झाली. धोंडूताईंना गाणे शिकवा, असे साकडे एके दिवशी त्यांच्या वडिलांनी नत्थन खाँ यांना घातले, आणि धोडूताई त्यांच्या शिष्या झाल्या. तीन वर्षांतच नत्थन खाँ यांनी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर अल्लादिया खाँ यांचे पुत्र भुर्जी खाँ यांनी महालक्ष्मी मंदिरात संगीत सेवा सुरू केली, आणि धोंडुताईंच्या वडिलांनी त्यांची भेट घेऊन धोंडूताईंना शिकविण्याविषयी विनंती केली. सूर्योदयाबरोबर सुरू होणार्‍या या संगीत साधनेतून धोंडूताईंना आवाजाचा कस राखण्याचे कसब साधणे शक्य झाले. संगीताच्या शिक्षणासाठी धोडुताईंना शाळा सोडावी लागली. १९५० मध्ये भुर्जी खाँ यांचे निधन झाले. तोपर्यंत धोंडुताईनी त्यांच्याकडून संगीताचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. पुढे जवळपास सात वर्षे मार्गदर्शन नसतानाच्या काळात धोंडुताईंनी गाण्याच्या मैफिली सुरू केल्या. केसरबाई केरकर यांनी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांना जाहीर निमंत्रण दिल्याने १९६२ मध्ये त्यांनी केसरबाईंना पत्र पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरविण्याची इच्छा व्यक्त केली आणि धोंडुताई केसरबाईं केरकरांच्या शिष्या झाल्या. त्यांच्या संगीतावर केसरबाईंच्या शैलीचा प्रभाव जाणवहोता. त्याविषयी धोंडुताई स्वत: आदरपूर्वक त्याचा उल्लेखही करीत असे.सांगीतिक आणि जीवनविषयक तत्वांच्या निष्ठेपायी त्यांनी कशाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर जे पटले, त्याचाच पाठपुरावा केला. संगीताच्या बाबतीत सांगायचे तर जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेची शुद्धता जपली आणि वैयक्तिक बाबतीत, संगीताची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिल्या.

संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल धोंडुताईंना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्या शिष्यांनी त्यांची खूप सेवा करून गुरु-शिष्य परंपरेचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असल्याचे दाखवून दिले.
१ जून २०१४ या दिवशी म्हणजे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने धोंडूताई कुलकर्णींचे मुंबईत निधन झाले; त्यांच्या निधनामुळे अभिजात गायिका व संगीततुल्य व्यक्तीमत्त्व हरपले आहे;

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*