भोसले, दिनकर दत्तात्रय (चारूता सागर)

मराठी कथाविश्वाला जळजळीत वास्तवदर्शी संकल्पनांचा स्पर्श देवून वाचकांना त्यांनी कधी स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल, अशा भयाण परंतु भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विश्वाची सैर, प्रत्यक्ष अनुभवायला कोणी लावली असेल तर ती दिनकर दत्तात्रय भोसले अर्थात चारूता सागर ह्यांनीच!

गरीब लोकांचे जीवन, त्यांच्या व्यथा, वेदना, अपेक्षा, व माणुस म्हणून इतरांकडून त्यांना किमान मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची रास्त आशा जेव्हा पुर्ण झाली नाही तेव्हा, चारूता सागरांची कथा जन्माला आली. अद्भुत कथांची व प्रेमकथांची लाट सरली, व त्यांच्या कथेने मराठी कथाविश्वाने सामान्य माणसांच खरं अंतरंग रेखाटण्याकडे आपला रोख बदलला. त्यांच्या कथांमुळे, मराठी कथासंपदेच्या समृध्द परंपरेत दाहक आयुष्यांची कलाबध्द मांडणी करणारे व भारताच्या सामाजिक व आर्थिक विषमतेकडे सर्वांचे लक्ष वेधणारे ग्रामीण लेखक व कथाकार निर्माण झाले. मराठी कथादालनाने आपली कात टाकली. कवठे महाकाळसारख्या आजही खेडेगाव समजल्या जाणार्‍या गावात राहून ज्या प्रकाराचे आयुष्य ते जगले त्याचे, स्वच्छ प्रतिबिंबच त्यायोगे सर्व रसिकांना त्यांच्या कथांमधुन न्याहाळता आले. मराठी साहित्यातील लघुकथाविश्वात एका वेगळ्या व दमदार सत्य अनुभवांचे पदार्पण चारूता यांच्या लेखनामुळे झाले व रसिक वाचकांनी त्यांच्या कथांना हृद्याच्या एका हळव्या कप्प्यामध्ये कायमचे अजरामर करून ठेविले. लिहीण्याचा त्यांचा ग्रामीण व बोलीभाषेच्या जवळ येणारा बाज, तगडी कथा व उत्कंठावर्धक शेवट, व सर्वात शेवटी पण अतिशय महत्वाचे म्हणजे, वास्तवदर्शी प्रसंगरचना व दृष्यांची गुंफण अशा काही वैशिष्ट्यांनी सजलेली त्यांची लेखनशैली मराठी रसिकमनाला चांगलीच भिडली. हमाली करताना काय किंवा स्मशानात प्रेतांना अग्नी देताना काय, चारूता यांच्यातील कलावंत सतत जागता राहिला.

अनुभवांची भेदक परंतु कलात्मक शब्दांत मांडणी करण्याच कौशल्य त्यांच्या जवळ ओतप्रोत असल्याने आत्मकथन हा त्यांच्या कथेचा आत्मा शेवटपर्यंत टिकुन राहिला. ‘नागीण’ हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह रसिकांच्या नजरेत भरला. त्यानंतर ‘मामाचा वाडा’ व ‘नदीपार’ हे त्यांचे दोन कथासंग्रहही भरपुर वाखाणले गेले. परंतु वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे या यशाच्या जाणीवेने हुरळुन जावून ते भरमसाठ लिहीत बसले नाहीत तर निवडक परंतु सकस अनुभवांनाचं ते आपल्या लेखणीतून जिवंत करत आले. चारूता सागर तसे प्रसिधीपासुन, पुरस्कारांपासुन तसेच चंदेरी रंगांमध्ये न्हाऊन निघणार्‍या सण, समारंभ व कार्यक्रम-सोहळ्यांपासुन चार हात लांबच राहिले असले तरी शेवटी त्यांच्या अष्टपैलु व जादुई लेखणीची दखल सर्वांना घ्यावीच लागली व कॅप्टन गो. ग. लिमये कथा पारितोषिक जाहीर झाले. ह्या कार्यक्रमात साक्षात पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या नागीण कथेचे वाचन केले होते. त्या पहिल्याच सार्वजनिक उपस्थितीत चारूता यांनी आपले खरे नाव दिनकर दत्तात्रय भोसले आहे हे जाहीर केले होते, व आपल्या खर्‍या नावाने पाठविलेल्या कथा संपादकांकडुन परत येत असत असा गौप्यस्फोटही केला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*