जन्म – दि. २२ नोव्हेंबर १९१७
डॉ. वा. म. कुलकर्णी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे संचालक, एशियाटिक सोसायटीच्या म. म. पां. वा. काणे इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच एशियाटिक सोसायटीच्या वाषिर्क जर्नलचे प्रमुख संपादक अशी अनेक महनीय पदे भूषवली होती. तरीही त्यांच्या उपजत ऋजुतेमुळे तसेच भिडस्त स्वभावामुळे ते प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहिले. आयुष्यभर शांतपणे ज्ञानसाधना करणं हाच त्यांचा धर्म राहिला. देववाणी संस्कृत आणि प्राकृत ह्या भाषांचं अध्ययन आणि अध्यापन तसंच अतिशय मूलगामी संशोधन करण्यातच त्यांनी आनंद मानला. निरंतर संशोधन हाच त्यांचा ध्यास होता आणि त्यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊन त्यांना अनेक मानसन्मानही प्राप्त झाले. परंतु तरीही सर्वसामान्य माणसाला त्यांची फारशी माहिती झाली नाही.
कोल्हापूरजवळच्या आजरा ह्या खेड्यात दि. २२ नोव्हेंबर १९१७ रोजी त्यांचा जन्म झाला. मोठं कुटुंब आणि चरितार्थाची जबाबदारी ह्यामुळे त्यांना स्वत:चं सर्व शिक्षण स्कॉलरशिपवर अवलंबूनच करावं लागलं. कोल्हापूरच्या सारस्वत बोडिर्गमध्ये राहून, स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून त्यांचं सर्व माध्यमिक आणि उच्च शिक्षण झालं पण त्यांच्या अंगभूत हुशारीमुळे अगदी एम्.ए.पर्यंत कधीच त्यांनी पहिला नंबर सोडला नाही. मॅट्रिकला त्यांची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती केवळ एका मार्काने हुकली, पण त्याची भरपाई त्यांनी नंतर युनिव्हसिर्टीत पहिले येऊन केली आणि सर्व मोठ्या, मानाच्या शिष्यवृत्त्या पटकावल्या. एम्.ए.साठी त्यांनी प्राकृत (अर्धमागधी, पाली, अपभ्रंश) भाषांचा विशेष अभ्यास केला. राजाराम कॉलेजात शिकत असताना कविवर्य विंदा करंदीकर आणि वसंतराव हुजूरबाजार त्यांचे सहाध्यायी होते. म ंबई विद्यापीठातून प्राकृतात एम्.ए. केल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून संस्कृतमध्ये एम्.ए. केलं आणि नंतर ‘जैन वाङ्मयातील रामकथा’ ह्या विषयावर मूलगामी संशोधन करून पीएच्.डी. मिळवली.
डॉ. कुलकर्णी हे हाडाचे शिक्षक होते त्यामुळे त्यांनी सारी हयात अध्यापनक्षेत्रातच व्यतीत केली. पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील सरकारी कॉलेजात प्राध्यापक म्हणून अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये सुमारे २० वर्षे आणि नंतर महाराष्ट्र राज्यसेवेत कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई (एल्फिन्स्टन तसेच इस्माईल युसुफ) अशा ठिकठिकाणी त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीने शिकवून संस्कृत आणि प्राकृत भाषांतील वाङ्मयाचा खजिना खुला करून दिला. विद्यार्थ्यांनाही त्यांच्याविषयी इतकं प्रेम वाटत असे की त्यांच्या नव्वदीच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘वामनविक्रम’ या नावाचा एक भलामोठा गौरवग्रंथ प्रकाशित केला.
एकीकडे अध्यापन चालू असतानाच त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर सखोल संशोधन करून विस्मृतीत गेलेले अनेक महत्त्वाचे ग्रंथ उजेडात आणले. ‘अलंकारशास्त्र’ हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय. लुप्त झालेले श्लोक किंवा गाथा शोधून त्यांची पुनर्प्रतिष्ठापना करणं हा तर त्यांचा आयुष्याचा ध्यास होता आणि ह्या महनीय कार्यासाठीच त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठमोठे सन्मान मिळाले होते. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना ‘संस्कृत पण्डित’ म्हणून गौरविले होते (१९९२) तसेच ज्ञानपीठ पुरस्काराच्या तुल्यबळ असा ‘आचार्य हेमचंद पुरस्कार’ त्यांना १९९८ मध्ये देण्यात आला होता.
कितीही मोठमोठे सन्मान मिळाले तरी डॉक्टरसाहेब कायम विनम्रच राहिले. किंबहुना त्यांना स्वत:च्या विद्वतेविषयी किंवा सन्मानपुरस्कारांविषयी कधीच बोल यला आवडत नसे. अहंकार तर दूरच. अगदीच खोदून खोदून विचारलं तरच ते बोलत असत. त्याऐवजी त्यांना त्यांच्या संशोधनाविषयी विचारलं तर मात्र अगदी रंगून जाऊन सांगत असत. त्यांच्या स्वभावाचा दुसरा विशेष म्हणजे त्यांचं वात्सल्य. त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि आप्तपरिवाराला याचा भरपूर अनुभव आलेला आहे. कुणाचं कौतुक करायचं झालं तर हात न राखता ते करीत असत. व्यक्तिगत आयुष्यात ते ‘सौजन्याची मूतीर्’ होते.
Leave a Reply