एकच व्यक्ती मनात आणेल तितक्या क्षेत्रांमध्ये किती लीलया संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंत पवार. ते ‘समाजासाठी वाहून घेणे’ या वाक्प्रचाराचे मूर्तीमंत प्रतिक होते. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच त्यांच्या जीवनाची अखेर झाली.
निफाडसारख्या बागायती भागातल्या ‘ओणे’ नावाच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ रोजी डॉ. पवार यांचा जन्म झाला. अभ्यासामधली हुशारी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी नाशिक व नंतर पुणे येथे घेऊन गेली. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम. एस. पूर्ण केल्यानंतर खरं तर स्वतःच हॉस्पिटल थाटून यथेच्छ पैसा कमावण्याची संधी पायघड्या घालून डॉ. पवारांची वाटच पाहत होती. कारण, त्या काळी मुळातच डॉक्टरांच दुर्भिक्ष, त्यात डॉ. पवार तर एम. एस. झालेले. पण, डॉ. पवारांनी कारकीदीर्चा शुभारंभ केला तो नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलपासून. पुढे त्यांनी स्वत:चे क्लिनिक आणि नंतर ‘सुश्रृत हॉस्पिटल’ सुरू केले. डॉक्टरी हा त्यांचा पेशा होता. ते एक सेवाव्रत आहे, धंदा नव्हे, याची जाण डॉ. पवारांनी अखेरपर्यंत ठेवली. ज्या समाजातून आपण मोठे झालो, त्याचे उतराई होण्यासाठी त्यांनी वैद्यकीय ज्ञानाचा पुरेपूर वापर केला. मग मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी जिल्हा पिंजून काढणे असो की कुटुंबनियोजनाच्या तीस हजार शस्त्रक्रिया. समाजकारणात त्यांचा प्रवेश १९८१ साली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माध्यमातून झाला. अल्पावधीत या संस्थेत त्यांनी आपले अढळ असे स्थान पक्के केले आणि अवघ्या चारच वर्षात ज्येष्ठ नेत्यांनी सरचिटणीस म्हणून संस्थेची सूत्रे त्यांच्या हातात सोपवली. तब्बल तेरा वर्षे ही संस्था डॉ. पवारांनी अतिशय कल्पकतेने व सेवाभावी वृत्तीने चालवली. याच कालावधीत अनेक खस्ता खाऊन त्यांनी संस्थेच्या मेडीकल कॉलेजला परवानगी मिळवली. पण, ९७ सालच्या पंचवाषिर्क निवडणुकीत पराभव झाल्याने संस्था त्यांच्या हातून गेली.
अर्थात २००२ साली मराठा समाजाने आपल्या हातून झालेली चूक सुधारत डॉ. पवारांकडे म. वि. प्र. परत सोपवली. संपूर्ण राजकीय आयुष्य शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले डॉ. पवार ९१ साली नाशिकचे खासदार बनले. ते २००४ पासून विधान परिषदेचे सदस्यही होते. याशिवाय डॉ. पवार यांनी शिक्षण, वैद्यकीय, स्काऊट, साहित्य अशा क्षेत्रात किती पदांवर होते याची गणती करणे अवघड आहे. पण, अलीकडेच त्यांनी निफाड सहकारी साखर कारखान्याला गर्तेतून बाहेर काढण्याचे ओझे खांद्यावर घेतले होते. नाशिकच्या ७८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आदर्श अशी ठरली. वैद्यकीय-सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारही देण्यात आला होता. पण, म. वि. प्र. च्या ७५० खाटांच्या भव्य रुग्णालयाला डॉ. पवार यांचे नाव त्यांचा विरोध झुगारून त्यांच्या हयातीतच संस्थेच्या सभासदांनी दिले.
(संदर्भ स्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स)
Leave a Reply