एक विदुषी, तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इ. विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. दुर्गाबाईंचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नगर, धारवाड, नाशिक, पुणे अशा विविध गावी झाले. मुंबईच्या सेंट झेव्हियर्समधून बी. ए. ला संस्कृत विषय घेऊन त्यांनी पदवी मिळवली. ‘अर्ली बुद्धिस्ट ज्युरीस्प्रूडन्स’ या विषयावर प्रबंध लिहून एम. ए. ची पदवीही त्यांनी मिळवली. इंग्रजी, मराठी, संस्कृत, पाली, बंगाली आणि गुजराती भाषा त्यांना अवगत होत्या. परंतु दुर्गाबाईंनी आपले लेखन मुख्यतः मराठी व इंग्रजी भाषेतून केले. त्यांची प्रकाशित पुस्तके शंभरच्या वर आहेत. त्यांनी स्फुटलेखनही बरेच केले. ‘ऋतुचक्र’, ‘व्यासपर्व’, ‘भावमुद्रा’, ‘डूब’ अशा दहा संग्रहातून त्यांनी ललितलेखन केले आहे.
मराठी लघुनिबंधाचे पूर्वीचे रूप बदलून तो वास्तव, अनुभवनिष्ठ आणि चितनात्मक करण्यात दुर्गाबाईंचे योगदान मोठे आहे. तसेच अतिशय ज्ञानलालसा आणि अनुभवसंपन्न जीवन यामुळे लोकसाहित्य, बौद्धधर्म, संस्कृत वाङ्मय इ. अनेक विषयांवरही त्यांचे लेखन संदर्भांनी परिपूर्ण असेच झालेले दिसते. निसर्ग सौंदर्याचा चित्रदर्शी प्रत्यय देणारे ‘ऋतूचक्र’ काय किवा महाभारतातील व्यक्तिरेखा वेगळ्याच दृष्टीने पेश करणारे ‘व्यासपर्व’ काय किवा साहित्य अकादामी पुरस्कार प्राप्त, वाचकाला चितन करायला लावणारे ‘पैस’ काय; हे ग्रंथ म्हणजे दुर्गाबाईंच्या लेखनाचा परीस स्पर्श झालेले अक्षरवाङ्मयच आहे. या व्यतिरिक्त लोकसाहित्य हा त्यांच्या अभ्यासातील आवडीचा विषय. तामिळी, पंजाबी, बंगाली, गुजराती, आसामी आणि काश्मिरी या अनेक प्रदेशातील लोककथा त्यांनी मराठीत आणल्या. रामायण, महाभारत, पुराण या वाङ्मयातील कथांचे अनुवाद त्यांनी केले. तर हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकन लेखकाच्या पुस्तकाचे ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ हा अनुवादही त्यांनी केला. बाणाच्या कादंबरीचा अनुवाद, तसेच श्री. व्यं. केतकर ह्यांच्या कादंबर्यांची समीक्षा करणारे ग्रंथ इ. महत्त्वपूर्ण लिखाण त्यांनी केले. सिद्धार्थ जातकाच्या सात खंडाचा अनुवाद हे दुर्गाबाईंचे फार मोठे कार्य आहे. जातकाच्या एकूण ५४७ कथांपैकी ५४४ कथांचा सटीप अनुवाद त्यांनी केला.
लेखनाबरोबरच दुर्गाबाई भरतकाम, विणकाम, पाककला, लोकसंस्कृती, प्राणीजीवन आणि वनस्पती जीवनाचा त्यांचा अभ्यास होता. भावोत्कटता, चितनशीलता आणि संवेदनाप्रधान यामुळे त्यांचे लेखन लोकप्रिय झाले. १९७५ मधील आणीबाणीच्या काळात झालेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात दुर्गेचा अवतार धारण करून शासनाविरूद्ध आवाज उठविणार्या त्या पहिल्या साहित्यिक होत्या. त्याबद्दल त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अशा या महाराष्ट्रातील सरस्वतीचे, दुर्गेचे ७ मे २००२ रोजी निधन झाले.
## Durga Narayan Bhagwat
Leave a Reply