फॅशनफोटोग्राफी, व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रातल्या विश्वातील अग्रगण्य मराठी नाव म्हणजे “गौतम राजाध्यक्ष”! १६ सप्टेंबर १९५० रोजी मुंबई येथे जन्मलेल्या गौतम राजाध्यक्षांचे घराणे मुळातच बुध्दीवादी व्यक्तींनी संपन्न असल्यामुळे शिक्षण व करियरसाठी उत्तम वाव होता. मुंबईतल्या सेंट झेविअर हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील शिक्षण व याच महाविद्यालयातून बी.एस्सी पर्यंतच पदवीचं शिक्षण गौतमजींनी पूर्ण केले. शिक्षणानंतर “लिंटाज” सारख्या मान्यताप्राप्त ख्यातनाम अॅड एजन्सीमध्ये “फोटो-सेवा” विभागात नोकरी आणि पुढे मुलाखतकार व छायाचित्रकार म्हणून व्यावसायिक कारकिर्दीस आरंभ झाला. १९८० ते ८७ पर्यंत “फॅशन फोटोग्राफर” म्हणूनही काम पाहिले.१९८० च्या सुमारास शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाश झोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक प्रकाशचित्रणास प्रसिद्धी लाभली.फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय न मानता त्यांनी कला-संस्कृतीच्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करीत आपल्या व्यवसायाला लेखनाची भरभक्कम जोड दिली. त्यानंतर गौतम राजाध्यक्ष यांनी “द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया”, “स्टारडस्ट”, “सिनेब्लिट्झ”,“फिल्मफेयर” यासारख्या प्रकाशनांसाठी फोटोग्राफी केली. छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. गौतमजींनी “चंदेरी” या पाक्षिकाचे काही काळ संपादनही केले होते.
१९९७ मध्ये त्यांचे “फेसेस” हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यामध्ये माधुरीपासून ऐश्वर्या रायपर्यंत, दुर्गाबाई खोटेंपासून शांताबाई शेळकेंपर्यंत, जे.आर.डी टाटांपासून अंबानी ते जनरल माणिकशॉ पासून सचिन तेंडुलकर व सुनील गावस्कर पर्यंत, लता मंगेशकर,आशाताईं भोसले, भीमसेन जोशी, आणि गुलजारपासून अगदी सुभाष अवचट यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.
गौतम राजाध्यक्षांनी “सखी” या मराठी चित्रपटासाठी; तर “बेखुदी”, “अंजाम” या हिंदी चित्रपटांचं पटकथा लेखन केलं होतं. याशिवाय अनेक भाषिक चित्रपटांसाठी “सिनेमॅटोग्राफी” केली होती.
१३ सप्टेंबर २०११ रोजी राहत्या घरी गौतम राजाध्यक्ष यांचे निधन झाले. गौतमजींच्या अकाली जाण्याने एक शांत तसंच उमदं सृजनशील आणि कलासक्त व्यक्ती हरपल्याची जाणीव सतत होत रहाते.
Leave a Reply